देशाला स्वातंत्र्य मिळवून भरपूर वर्षे झाली परंतू अजूनही गावाला नीट रस्ता नाही. गाव तसं फाट्याचं आडरानी, मेन रोडवर आमदाराने आमदार निधीतून चोपडाचरळ रस्ता केला जागोजागी मोठाले बोर्ड लावले 'एक पाऊल प्रगतीच्या दिशेने वगैरे' मग वैतागवडीकडे जाणारा रस्ताच का सोडावा म्हणून तो ही बांधला. अर्धाच!
एखादा नवीन पाहूणा आपली दुचाकी घेऊन वैतागवाडीत आला की नक्कीच तो गंडतो, साधारण चारशे मीटर डांबरीकरण झालेला चोपडाचरळ रस्ता. गाडी इथून जरा पुढे सरकली की मोठमोठाले चमालगोटे. गाडी त्यातून धुपूक-धुपूक चालते गाडीचं शॉकअप्स पाकपुक करतं.
तसा गावाला फुलवाडीच्या दिशेने सरळ डांबरी रस्ता आहे तिथूनच गावकरी ये-जा करतात. नवीन माणूस मात्र गावच्या अधिकृत भूलभूल्लैया रस्त्याने येऊन एकदातरी माती खातोच.
गावात दुसरी मोठी पंचाईत म्हणजे गावात वीज कधी नसतेच कायम डी. पी. चा गट्टू जळतो कधी एखाद्या गल्लीतला डीव जातो मग आधी लोकं बाहेर येऊन चेक करतात आपलीच गेली का सगळीच गेली.. मग फाटका जऱ्या म्हणतो 'हिचा मायचा मोकाळा हिच्या तं.. आपलीच गेली रे मायभिन, रोजची पंचाईत हे ही आता जा लागते डी. पी. वर येळू घ्यून'
मग अंधारात डीव टाकायला गावातले माणसं जातात तसे हे लोकं म्हणजे गावचे प्रकाशदूतच तसंही ह्यांना डीव गेला की डीव टाकायला मजा येते जीवन चंरवांडे लगेच त्याची फटफटी काढतो म्हणतो मले येऊ द्या रे.. नाही तं मरी बिरी जाईल एखादं खंब्याले चिपकून.
हे रात्री बेरात्री जीव मुठीत अन बांबू खुटीत घेऊन गावासाठी इतकं करतात म्हणजे समाजसेवाच! ही समाजसेवा मात्र कुणालाच दिसत नाही परंतू एखादा अधिकारी नुसता चिखलात तरी बूट काढून चालला तरी त्याची बातमी होते असो...
कमलाबाई म्हणते उजेडापेक्षा अंधारच बरा त्यामुळं तरी ह्यांले काही दिसत नाही आन ह्याची भणभण थांबती. नाहीतर उजेड असला की हा चाळ्याचा माणूस रातभर झोपू देत नाही. सारखं खुडखुड करतो आठ येळंस मुतायले जातो.
गावात वायरमन अचानक कधीतरी येतो हा एकदम भंकस माणूस एकदम पच्चीस. वीज नसण्याचं दुसरं एक कारण अर्ध गाव आकड्यावर आहे परंतू ह्यात गावाकऱ्यांचा काही दोष नाही सगळे ह्या भंकस वायरमनचे कारनामे.
ह्याला गावातल्या भरपूर लोकांनी कागदपत्रे दिली पण कनेक्शन अजून आलं नाही साधे सही मारायचे हा दोनशे घेतो.. एखाद्याने स्वतः कागदपत्रे जमा करून स्वतः सर्व केलं तरी हा काही ना काही खोडा घालतोच..
शिवाय गावात अगोदर सलून नव्हतं आता सुरु झालं हा न्हावी बाहेरून येऊन इथे स्थायिक झाला कायमचा. आधार-मतदान इथलं करून घेतलं परंतू शेवटी गावासाठी भडेच! याला कुणीही येता जाता धमक्या देतो शिवाय गावातले काही बेवडे ह्याच्याकडे दारुसाठी दहा-वीस कमी पडले तर मागतात हा ही बिचारा देतो हिशोब ठेवत नाही हा ही समाजसेवकच!.. वायरमनची हजामत फुकट करावी लागते नाहीतर तो ही ह्याला धमक्या देतो..
त्याचं पोरगं दुकानावर असलं की गावातले बेवडे पच्चीस वायरमन मात्र फिरकत नाही गरम रक्त शेवटी... मात्र घरातून येडं म्हणून काढून दिलेला चांगला पन्नाशीतला वामन मात्र रोज गोट्या चोळत चोळत टपरीजवळच्या एका दगडावर आपलं बूड टेकवून टिंगलटवाळ्या करत असतो तसं ह्याला गल्लीतलं कुत्रही भाव देत नाही परंतू हा रुबाब दाखवायला कमी करत नाही 'लावू का सरपंचाले फोन हलवू का तुमचं दुकान अढून.. राहुल्या.. जास्त चरचर करू नको.. तुह्या गेम कराले काहीच लागत नाही बाबू पण शेवटी माणुसकी!... राहुल्याही तिकडून म्हणतो माणुसकीची मेली माय! आम्हाले काय वाटीत पाणी आन सदा आमदानी'
वामन शेवटी तेवढं टिंगलटवाळ्या करून भूक लागली की परत गोट्या चोळत चोळत घराकडे निघतो मधेच त्याला कुणीतरी ये वामन हात बदल म्हणून चिडवतो मग तो त्याच्या मागे लागतो...
वामनसारख्याचं बरं असतं आला दिवस ढकलत जगायचा तुकडापाणी आयता.. कोणतेही कष्ट नाही कुठेही चकाळ्या करायच्या लोळत पडायचं खायचं हागायचं बास!...
आरामात राहायला आधी खूप कष्ट करून पैसा कमवावा अशी रीत असली तरी आराम करायला कुठे पैसा लागतो फक्त आपल्यासाठी राबणारा कुणीतरी असावा जो राबतोय त्याच्या शिव्या पचवण्याची धमक आपल्यात असावी मग आराम करायला आपण मोकळे.. वामनसारखे!..
तशी गावात शेती बक्कळ आहे त्यामुळे कामाची काही कमी नाही पेरणी, निंदन, खुरपण, मिरच्या तोडणं, आद्रक खणनं, आद्रकीला भर देणं, ठिबकच्या नळ्या पांगवनं जमा करणं, औषध मारणं असे कामं गावात कुणाच्या ना कुणाच्या शेतात कायम चालूच असतात..
मासिकात वर्तमानपत्रात जे छापून येतं शेतमजुरांचे मोठे जमीनदार शोषण करतात वगैरे त्यांचे जीवन खूप हालाखीचे आहे वगैरे ह्या भंपक गोष्टी वैतागवाडीत नाही. मजुराला डिमांड आहे शेतकरी सारखं मजुराच्या शोधात असतो मजूर भेटत नाही एकतर गावात मजुरी करणारे हात कमी नवीन पोरा टोरांना ते जमत नाही ते एम.आय.डी.सीत काम करतात
फक्त ऊनसावलीचा फरक राबावं तर दोघांनाही लागतं शेवटी ते कामगार काय अन शेतमजूर काय दोघेही मजूरच एखाददुसरा चांगल्या हुद्द्यावर असतो त्याची बात वेगळी..
तशा वैतागवाडीत सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत... जीवनचा गुत्ता गावात आहे तो स्टॉकमध्ये पन्नाच ने कॉटरी आणून शंभरला विकतो पिणारे पितातच. झेरॉक्सवाला बाळू एका झेरॉक्सचे चारपाच रुपये घेतो घेणारे घेतातच.. राशन दुकानातून आणलेले तांदूळ काही लोकं काही लोकं दुकानात विकून टाकतात वं राशनचा पैसा वसुल करतात वगैरे...