मी जयराम दसपुते. आता पार थकलोय म्हातारा झालोय तसं पंचेचाळीस वर्षे हे काय म्हातारं होण्याचं वय नक्कीच नाही तुमच्या दृष्टीने! परंतू मला वृद्धावस्थेची जाणीव खुणावू लागलीय लक्षणं तर तशीच आहे.. काळेभोर तलम केस आता पांढरे फटक पडलेत, डोळे पार खोल गेलेले आहेत, कपाळावर आठ्या दिसायला लागल्याय, मान सारखी हलते, जसं काय ती कायमची मुचकलीय वं आता शेवटपर्यंत असंच मानेला लकवा मारत जगायचंय.. मला माझाच विषाद वाटू लागलाय..
नको वाटतं जगणं मृत्यूचा दारात स्वतःला ढकलून ही जगण्याची सीमारेषा पार करावी वाटते.. परंतू स्वतःच्या हाताने स्वतःलाच तडफडून मारणं मला मान्य नाही मृत्यूलोकात गेल्यावर मी मलाच माफ करू शकणार नाही म्हणून जगतोय.. विधात्यानेच माझी कैफियत ऐकून लवकर या जाचातून मोकळं करावं... माझा वेळ आलेला आहे पण काळ आलेला नाही... ह्या काही दिवसात मी जेव्हा पारावरून धिमे पावलं टाकत टाकत झोपायला घरी येतो तेव्हा मला बाहेर माणसांच्या सावल्या दिसतात...
खोली ला दोन खिडक्या आहेत एक कोचाच्या मागच्या बाजूला वं दुसरी पूर्वेला तिथून घरात येणारा नवीन माणूस अंधुक-अंधुक दिसतो त्याआधी त्याच्या चपलांच्या आवजानेच मी ओळखून जातो की कुणीतरी येतंय... परंतू ह्या काही दिवसात दिसणाऱ्या माणसांच्या सावल्या ह्या माझ्यासाठी पूर्णतः वेगळ्या आहे सारखी मला अनैसर्गिक भासांची जाणीव करून देतात... भीतीने माझा जीव पाणी पाणी होतो...
चपलांच्या आवाजाने कुणीतरी आल्याची जाणीव ह्या सावल्यांत नाही... ह्या सावल्या कोणताही भयप्रद म्हणावा असा आवाजही सोबत घेऊन येत नाही... फक्त कोचाच्या पूर्वेला असलेल्या खिडकीकडे पाहिलं की एक अंधुकशी.. पुसट अशी मानवी आकृती दिसते (सावलीच) वं खूप वेगाने ती कोचाच्या मागच्या खिडकीकडे जाताना दिसते दुसऱ्याच क्षणी डोळ्याची पापणी हलायच्या आत गायबही होते... हे चक्र पाच दहा मिनिटाच्या फरकाने सतत चालू असतं....
आज ह्या सावल्या दिसण्याचा दहावा दिवस नेमकं ह्याचं मूळ सापडायला पाहिजे म्हणजे काहीतरी नक्की करता येईल...असं मनाने ठाव घेतला... तेवढ्यात जिन्यावर कुणाच्यातरी चपला वाजल्याऽऽऽ म्हणजे नक्कीच कुणीतरी आपल्याकडे आलंय थोडासा का होईना आधार द्यायला... कडी उघडली गेली शेजारचा रामराव होता बिडी संपली म्हणून बिडी मागायला आला होता "ही काय दलिंद्री हाय राव त्यात मधी , आपण सगळं काम करावं.. शेत, भात पाहाव..त्यात मधी...त्यातही बायको बिडीसाठी पैसे द्यायला काचकूच करते त्यात मधी..आपल्याले हे दारखंडाचं वाईट यसन त्यामुळं आपलं घरात काही चालत नाही.. त्यात मधी.. नाहीतर बायको अशी नीट केली असती.. त्यात मधी... तुझ्याकडे आहे का एखादी?' त्यात मधी..."
मी त्याने म्हणताच क्षणी एक बिडी काढून दिली. एक मी स्वतःसाठी पेटवली, नाही म्हणायला आज कुणीतरी सोबती मिळाला... तेवढीच कंपनी... बिडीचे झुरके मारत नाकातून तोंडातून धुव्वा काढत रामरावसोबत गप्पा रंगात आल्या रामरावचं घोडं अजूनही बायकोवर अडून बसलं होतं बायकोला जाम शिव्या हासडीत होता... मी मात्र माझ्याच दुनियेत रममान झालेला पाहून त्यानेच शेवटी विचारलं काय झालं जयऱ्या पूर्वीसारखा मोकळं बोलत नाही, कधी चहा घ्यायला येत नाही, तब्येतही खराब झाली रे कायचं एवढं टेन्शन?... तुला कुणीच नाही म्हणून शेजारही नाही का आता?.. जेवला का?.. कुणीतरी आज आस्थेने विचारपूस केली मनाला जरा बरं वाटलं.... विषय टाळायचा म्हणून मी म्हणलं काही नाही रे असंच... आता कोण करा-सवरायला राहील नाही म्हणून जरा टेन्शन येतं.... एक मन म्हणत होतं की हयाला सर्व सांगून टाकावं परत वाटलं नको फुकटची सहानुभूती नकोच आपल्याला... कोण आधार देतं आणि कोण सहानुभूती हे ओळखता यायलाच हवं...माझे आधाराचे दिवस संपले होते... नुसतं सहानुभूतीवर मन हलक होणार नाहीच मग त्यापेक्षा नकोच... त्याला बायकोचं टेन्शन मला दिसणाऱ्या सावल्याचं...त्याचं निदान लोकांना पटेलही आपलं कुणाला पटेल?..
रामराव शेवटी म्हणाला अरे जयऱ्या घरी सोले आणि भाकरी आहे आणून देऊ का? मी मानेनेच हो म्हणलं आणि परत आपल्याला त्या अनैसर्गिक भासांची अनुभूती नको म्हणून त्याच्यासोबतच त्याच्या घरी गेलो सोले-भाकरी आणायला... त्याचे बायकोने घरातून आवाज दिला येताना डबा वापस आणा ध्यानानं... रामराव आणि मी परत खोलीवर आलो पोटात आधीच भुकेचे आगडोंब उठत होते त्यामुळे मी सोले-भाकरीवर लक्ष केंद्रीत केलं... रामराव चं बायकोपूरान चालूच होतं... अर्थात मी ही ऐकून घेत होतो म्हणून तो ही सांगत होता.. 'सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा दिलदार हवा' हेच त्याने पारावर सांगितलं असतं तर कुणीही 'बायल्या, दळण्या' म्हणून त्याची खेचली असती माझं बरं होतं मी फक्त होकार देत होतो... एखाद्याची गोष्ट कितीही रटाळवाणी असली तरी आपल्याला ती बहिर होऊन ऐकावी लागते.. उलट प्रश्न केला की गंडला कार्यक्रम.. सांगणाऱ्याचा इंटरेस्ट जातो..
आज फुल जेवण केलं नाहीतर मी एरवी नुसते पोहे-भात ह्यावर जगत होतो कसेतरी दिवस काढत होतो आज भाजी-भाकरी खाल्ली पोटोबा शांत झाला.. रिकामा डबा धुवून मी रामरावजवळ दिला... रामराव जाताना म्हणाला येतो रे काळजी घे... काही लागलं-सवरलं तर मागून घेत जा... आज कोणताही विचार डोक्यात नव्हता पडल्या पडल्या झोप लागली..
***
पुन्हा एक भडक स्वप्न तीच चाहूल त्याच सावल्या पूर्वीपेक्षा जरा गडद झालेल्या... आज जरा वेगाने पळताय.. एकामागून एक सावली सारखी कोचाच्या मागच्या खिडकीवर आदळतेय परत दिसेनाशी होतेय... आता जरा मी कणखर व्हायचं ठरवलं शेवटी ह्या सावल्यांच्या आपण मुळापाशी गेलं पाहिजे ह्याचं कारण समजून कायमचा नायनाट केला पाहिजे एक तर माझा होईल किंवा त्यांचा.. तसंही आपण मरण मागतच आहोत... मग ज्याला मरायचंच आहे त्याला कसली भीती.. मी जरा धैर्यानेच खिडकीची काच उघडली... काच उघडताच जे पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं तिथून सर्रकन सपाट्याने, आवाज न करता-धुरासारखं, सावलीसारखं काहीतरी आत येताना दिसलं नंतर मात्र स्फोट झाल्यासारखा आवाज माझ्या कानात घुमत होता एक भलामोठा काच माझ्या दिशेने येऊन भुईवर भगदाड पाडून गेला मी जेव्हा समोर पाहिलं तेव्हा भुईवरून भळाभळा रक्त खाली येत होतं आणि सावली मला मारण्यासाठीच आसूसलेली दिसत होती इतक्या खुनशी नजरेनं ती माझ्याकडे पाहत होती... प्रचंड गोठवून टाकणारी अवस्था... शेवटी निर्धार करून तं तं ऽऽ मं मं ऽऽ करत विचारलंच 'कोण आहात तुम्ही' 'आणि मला का असं छळताय?' त्याक्षणी ती सावली प्रचंड गडद होत गेली आणि तिने मानवी आकार धारण केला.. आढ्याला सुतळी लटकावी अन अंधातरीच तरंगत रहावी अशी लोंबकळनारी जीभ, त्या जिभेतून सारखी खाली टपकणारी लाळ, काळेडक पडलेले दात, एखाद्याचं नाक सडावं आणि ते गोळा होत जात ओठांजवळ लोंबकळत राहावं असं विचित्र पद्धतीचं नाक, बाहेर आलेले डोळ्यांचे बुबूळं, एकदम मळकट जुनाट झालेली साडी, पाय मात्र नाहीच अशीच अर्धी तरंगत राहणारी ती गडद झालेली सावली या सर्वांत आश्चर्यकारक म्हणजे जसं माझ्या भुईवर भगदाड पडलं होतं तसं तिच्याही भुईवर होतं आणि त्यातून सारखं रक्त वाहत होतं.... शेवटी परत मी सर्व जीव एकटवून म्हणालोच कोण आहेस तू? मला का छळतेस.. तसा प्रचंड हिंस्त्र हसण्याचा आवाज खोलीभर घुमत राहिला आणि तो आवाज खोल होत जात रडण्यात बदलला परत कणखर होत तिने उत्तर दिले कोण आहेस तू मला विचारतोस? मला विचारतोस कोण आहेस तू?. अरे सुमीऽऽऽऽऽऽ सुमीऽऽऽऽऽऽ आहे मी तुझी बायको.. मी दोषी नव्हते रे चंडाळा... तुझ्यामुळे मला मरावं लागलं स्वतःला मारावं लागलं तसंही तुझ्या सहवासात शेवटून शेवटून मेलेलेच होते... सारखी माझ्यावर शंका घेत राहिलास.. घरी आल्या गेल्या माणसांवर शंका घ्यायचास... त्यांच्यादेखत माझा अपमान करायचास.. पार कमरेच्या खाली बोलायचास.. तेव्हाही तुला सावल्या दिसायच्या घरात कोण आलं मी बाहेर होतो तेव्हा असं विचारायचास... मी जाताना पाहिलं खरं खरं सांग असं विचारायचास तुला सारखं वाटायचं ही माझ्याजवळून काहीतरी लपवतेस... पण मी काहीच लपवत नव्हते रे चंडाळा... तरीही तू मला कधी बरं पाहिलं नाहीस... जेव्हा शंका येईल तेव्हा माझ्यावर सूड उगारायचा म्हणून मला कसंही भोगून घ्यायचास तरीही मी निमूटपणे सहन करायचे तुला... कुणाजवळ ही गोष्ट बोलून दाखवायचे नाही, आज ना उद्या तू सुधरशील ह्या आशेवर.. कीती दिवस हे सहन होणार होतं??... आता मात्र तुला मारणार नाही... परंतू नीट जगूही देणार नाही खेळत रहा मरेपर्यंत ह्या सावल्यांचा खेळ
...
सकाळ झाली भडक स्वप्न सरलं.. प्रचंड पश्चातापाने अंथरूनातून उठलो... हे भास आता मला मरेपर्यंत पुरेल माझी साथ काही सोडणार नाही.. माझ्यासारखे असे कितीतरी जयराम निव्वळ शंकेपायी आपल्या संसाराची राखरांगोळी करून बसलेले असतील देव जाणो....
कर्मशः... समाप्त **